Monday, July 19, 2010

paithani.

फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, टोपडी शेले शाली !!१!!

त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर, जरी चोकडी , रंग तिचा सुंदर धानी !!२!!

माझी आजी लग्नामध्ये हि पैठणी नेसली होती
पडली होती सारयांच्या पाया हाच पदर धरून हाती !!३!!

पैठणीच्या अवती भवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची अनोळखिची जाणीव गूढ आहे त्यास !!४!!

धूप ..कापुर... उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण
पैठणीने या जपले एक तन एक मन ... !!५!!

खस-हिण्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची , चमेलीची आरास पदराआडून हसली !!६!!

वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला !!७!!

पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले, माझ्या आजीचे सोने झाले !!८!!

कधीतरी हि पैठणी मी धरते उरी कवळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते जवळून !!९!!

मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा ......... !!१०!!

No comments:

Post a Comment